सुपे ( ता.बारामती जि.पुणे)गावातील ओंकार इंगळे यांच्या हॉटेल श्वेता येथे एक अनोळखी इसम पाण्याची बाटली भरण्यासाठी आला होता. अंगावर मळलेले कपडे वाढलेले केस व दाढी अशा अवस्थेत तो व्यक्ती होता. तेथे पत्रकार श्री अमोल अरुण धेंडे यांनी व्यक्तीला पाहिले व त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीचे नाव संतोष शिरसाठ असून तो व्यक्ती थाळनेर या गावचा असल्याचे समजले . दुर्लक्ष करून तेथेच विषय न सोडता पत्रकाराने गुगलवर थाळनेर या गावाचा शोध घेतला तसेच इंस्टाग्राम वर थाळनेर गावातील कोणी व्यक्ती सापडतो का याचा शोध घेतला. इंस्टाग्राम वर श्री अखिल पिंजारी नामक व्यक्तीशी संपर्क झाला असता त्यांनी पत्रकाराचा संपर्क थाळनेर जिल्हा धुळे येथील सरपंचांशी करून दिला. सरपंचांनी आबा पवार नामक व्यक्तीचा संपर्क क्रमांक दिला व हरवलेल्या व्यक्तीचे कुटुंब सध्या बीड या ठिकाणी वास्तव्यास आहे असे सांगितले. आबा पवार यांनी हरवलेले व्यक्तीचा मुलगा मुकेश शिरसाठ यांचा संपर्क क्रमांक पत्रकार श्री अमोल धेंडे यांना पाठवला. शेवटी पत्रकाराने जेव्हा सदर व्यक्तीच्या मुलास संपर्क केला व तो मुलगा आपल्या हरवलेल्या वडिलांशी बोलला तेव्हा पिता-पुत्रांना अश्रू अनावर झाले. मी आहे त्या अवस्थेत लगेच तिकडे यायला निघतो असे म्हणून तो व्यक्ती सुपे गावामध्ये आला व आपल्या हरवलेल्या वडिलांना भेटला व त्यांना स्वगृही घेऊन गेला. आम्ही वडिलांना चार महिन्यापासून शोधत होतो पण ते आम्हाला सापडले नाही म्हणून निराश होऊन आम्ही शोध बंद केला तुम्ही देवासारखे धावून आला व आमचे हरवलेले वडील आम्हाला मिळाले या शब्दात सदर व्यक्तीच्या मुलाने व ३ मुलींनी पत्रकार श्री अमोल धेंडे यांचे आभार मानले. स्वतःचे वैयक्तिक दैनंदिन आयुष्यातील प्रश्न सोडवण्यात व्यस्त असलेल्या समाजात आपण राहतो ; येथे कोणालाही कोणासाठी वेळ नाही अशा जगात श्री अमोल धेंडे यांनी हरवलेल्या व्यक्तीला कुटुंबीयांसोबत भेट घालून देऊन एक चांगला सामाजिक सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.


