मुंबई : घाटकोपर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका उच्चशिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तरुणीने पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस कथित आरोपीचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी तक्रारदार तरुणीने आपली माहिती लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर उपलब्ध केली होती. संकेतस्थळावरील माहिती पाहून एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. आपण परदेशात नोकरी करीत असून काही दिवसांनी भारतात परतणार असल्याची बतावणी त्याने केली. त्यानंतर अनेक दिवस दोघे फोनवर बोलत होते. एक दिवस त्याने भारतात येत असल्याचे बनावट तिकीट आपल्याला दाखवले, असे तरुणीने याप्रकरणी केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.
या व्यक्तीने १८ नोव्हेंबर रोजी तरुणीला फोन केला. आपण दिल्ली विमानतळावर आलो असून विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडल्याचे त्याने तरुणीला सांगितले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पहिल्यांदा त्याने तरुणीकडे ३५ हजार रुपयांची मागणी केली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तत्काळ त्याला ऑनलाईन पैसे पाठवले. त्यानंतर आपल्याकडे अधिक डॉलर आणि दागिने असल्याने त्याचा दंड भरण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी त्याने तरुणीकडे केली.
तरुणीने पुन्हा त्याला पैसे पाठवले. मात्र त्यानंतर त्याच्याकडून मागणी वाढतच गेली. तरुणीने त्याच दिवशी दिल्ली विमानतळ गाठले. तेथे पोहोचल्यावर तिने चौकशी केली असता आशा कुठल्याही व्यक्तीला थांबविण्यात आले नसल्याचे तिला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पुन्हा मुंबई गाठून पंतनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.